परीक्षा .. ताण .. आणि दृष्टिकोन
भाग : १
परीक्षा अगदीच जवळ आली आहे.घराघरात परीक्षेचे सूर घुमत आहेत. विद्यार्थी, पालक सगळ्यांच्याच मनामध्ये वेगवेगळे प्रश्न, विचार डोकावत आहेत.
परीक्षा कशी असेल?
कसे प्रश्न येतील?
मला सगळे आठवेल ना?
माझा अजून सर्व अभ्यास देखील झाला नाहीये, काय करू मी?
मला चांगले मार्क्स मिळतील ना ?
चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल काय ?
कमी मार्क्स मिळाले तर आई-बाबांना काय वाटेल?
असे एक ना अनेक प्रश्न.......
परीक्षा म्हटलं की बेचैनी आलीच, थोडा ताण हा आलाच. आता हेच पहा ना , मागचे एक दीड वर्ष झाले आपली सर्वांची परीक्षाच तर सुरु आहे. हा कोरोना काळ हा एखाद्या परीक्षेसारखाच तर आहे. ताण, अस्थिरता , काळजी, भीती, असंख्य प्रश्न आणि अगदी पुस्तकाबाहेरचा प्रश्न यावा तशीच अवस्था होती आपली. पण ही परीक्षा आता संपताना दिसतेय, परिस्थिती हळू हळू पूर्ववत होताना दिसतेय. परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवत असते.
याही परिस्थितीमधून आपण काय शिकलो ? थोडा विचार करून बघा......
परीक्षा कितीही मोठी असली तरी हिम्मतीने, धैर्याने, योग्य मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाने , प्रामाणिक प्रयत्न करून अवघड परीक्षेतून ही आपल्याला चांगले गुण मिळवता येऊ शकतात. आणि म्हणूनच या परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.
परीक्षा म्हटलं की थोडा फार प्रमाणात टेंशन येणे, अगदीच साहजिक आहे. आणि या ताणाचा फायदाच होतो.
तो कसा ?
हा ताण तुम्हाला परीक्षेसाठी जागरूक ठेवतो, प्रेरित ठेवतो, लक्ष केंद्रित ठेवायला मदत करतो. पण हाच ताण जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होतो, तेव्हा तो शारीरिक आणि मानसिक इजा पोहचवतो.
आज आपण हा तणाव कसा नियंत्रित ठेवू शकतो, यासाठी विद्यार्थी आणि पालक काय करू शकतात, तुमचा दृष्टीकोन कशा प्रकारे मदत करू शकतो यावर चर्चा करणार आहोत.
सर्वात पहिले जाणून घेऊया या तणावाची शारीरिक लक्षणे काय असू शकतात ?
सामान्यपणे तणावाची लक्षणे खालील प्रमाणे दिसू शकतात.
हात पायांना घाम फुटणे.
अस्वस्थ वाटणे .
झोप न लागणे.
चीड चीड होणे, राग येणे.
भूक ना लागले/ अति खाणे.
संवाद टाळणे.
अभ्यासात लक्ष केंद्रित न करू शकणे.
धाप लागणे.
डोकेदुखी, पोटदुखी.
भोवळ इ.
असा अनावश्यक ताण मुलांच्या अभ्यासावर, शैक्षिणक प्रगतीवर परिणाम तर करतोच शिवाय त्यांच्या मानसिकतेवर परिणाम करू शकतो. दीर्घ कालीन अवाजवी तणाव अनेक गंभीर मानसिक आणि वैद्यकीय समस्यांना आमंत्रण देऊ शकतो जसे नैराश्य, भीती ,आतमविश्वास गमावणे, झोपेच्या समस्या , शारीरिक दुखणे, स्नायूंमध्ये तणाव जाणवणे इ.
या तणावाची उत्तम असे औषध काय असेल तर तो मुळात येऊ ना देणे, अथवा त्याबद्दल जागरूक राहणे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील या तणावाची काय कारणे असू शकतात ते आपण पाहूया.
पहिले आणि सर्वात महत्वाचा कारण म्हणजे अपेक्षा. अवाजवी अपेक्षांचा ओझं. स्वतःच्या स्वतःकडून असलेल्या अपॆक्षा, पालकांच्या आणि शिक्षकांच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा.
अपयशी होण्याची भीती, निराश होण्याची भीती.
स्पर्धेची भीती , मागे राहण्याची भीती .
भविष्याची काळजी, ऍडमिशन मिळवण्याची काळजी .
मुलांवर असणाऱ्या जबाबदारी ची काळजी, घरातील आर्थिक, कौटुंबिक समस्या इ.
या सर्व गोष्टींमुळे मुलांच्या मनावर ताण वाढतच जातो. विशेषतः आपल्याकडे १०वी -१२वी मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Do or Die ची परिस्थिती निर्माण केली गेलेली असते. विद्यार्थ्यां बरोबर पालकही तणावात दिसतात.
जसे शारीरिक स्वास्थ्य महत्वाचे असते तसेच मानसिक स्वास्थ्य ही तितकेच महत्वाचे असते याची जाणीव पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी.
परीक्षा हा आयुष्यातील महत्वाचा भाग असतातच, आयुष्याला निर्णयात्मक वळण देतात, नवी संधी निर्माण होतात. परीक्षा तुमच्या बौद्धिक, तार्किक, वैचारिक प्रगतीमध्ये मदतच करतात. परंतु,आयुष्य परीक्षेपुरता मर्यादित नाही. परीक्षेत मिळणारे यश अपयश म्हणजे तुमचा आयुष्य नक्कीच नाही. विशेषतः परीक्षेत मिळणाऱ्या अपयशाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे फारच महत्वाचे ठरते.
क्रमशः
( उद्याच्या लेखात विद्यार्थी यावर काय करू शकतो? यावर चर्चा करू या )
धन्यवाद !
सौ. नेहा पाटील - नलावडे
Career Counsellor & Parenting Expert
Conatct : 9699445258
1 Comments
उत्तम विश्लेषण आणि पुढच्या भागाची जिज्ञासा
ReplyDelete